ladki bahin august installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ज्या महिलांचे हप्ते अडकले आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करता येईल आणि अडकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. मेसेजमध्ये एक लिंक देऊन आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक डिटेल्स आणि फोटो यांसारखी वैयक्तिक माहिती मागितली जात आहे.
मात्र शासनाकडून याबाबत स्पष्ट खुलासा करण्यात आला आहे. हा दावा अधिकृत नाही.
नवीन नोंदणी आणि ई-केवायसीबाबत शासनाचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सध्या बंद आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला “ई-केवायसी पुन्हा सुरू झाली” हा दावाही अधिकृत नाही. अशा अनधिकृत लिंक्सवर क्लिक करून वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती दिल्यास फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थी महिलांनी कोणत्याही अपरिचित वेबसाइटवर किंवा लिंकवर क्लिक करू नये आणि आपली माहिती देऊ नये.
योजनेबाबतची अचूक आणि अधिकृत माहिती फक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा संबंधित विभागांकडूनच तपासावी.
ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट २०२६ चा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३३९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकांसाठी योजनेकरिता एकूण ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधीचे वितरण करताना लाभार्थींची योग्य छाननी करून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
व्हायरल मेसेजपासून सावध राहा
“लिंकवर क्लिक करा आणि अडकलेला हप्ता मिळवा” अशा प्रकारच्या संदेशांवर थेट विश्वास ठेवू नका. नवीन नोंदणी, ई-केवायसी अपडेट किंवा हप्ता वितरणासंबंधी कोणतीही माहिती फक्त शासनाच्या अधिकृत यंत्रणांकडूनच घ्या. वैयक्तिक कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती अनधिकृत ठिकाणी देणे धोकादायक ठरू शकते.
लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी आपल्या बँक खात्यात हप्ता जमा झाला आहे का, हे नियमितपणे तपासून घ्या. अधिकृत अपडेट्ससाठी शासनाच्या अधिकृत स्रोतांवर लक्ष ठेवा.