E-Pik Pahani अस्मानी संकट आणि त्यातच ई-पीक पाहणी ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने ई-पीक पाहणीची अंतिम मुदत वाढवली आहे, ज्यामुळे आता शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या पिकांची नोंद करू शकणार आहेत.
यावर्षी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस आणि ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक भागांतील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतं पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी जमीन खरडून गेली. या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणे एक मोठी डोकेदुखी ठरत होती. कारण ॲपचा सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदणी रखडली होती.
E-Pik Pahani मुदतवाढीची गरज का होती?
14 सप्टेंबरपर्यंत सुमारे 60% क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे केवळ 47.89% क्षेत्राचीच नोंदणी होऊ शकली. त्यामुळे शेतकरी अनुदान, पीक विमा, आणि नुकसान भरपाईसारख्या महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहण्याची भीती होती. शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अखेर, शासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेतली.
शासनाचा महत्त्वाचा निर्णय
अतिवृष्टी आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या लक्षात घेऊन, शासनाने 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही परिस्थितीची गंभीरता पाहून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनी पुन्हा मुदतवाढीची विनंती केली. त्यानंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, राज्यातील पूरस्थिती आणि शेतकऱ्यांची अडचण विचारात घेऊन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ई-पीक पाहणीची मुदत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे आता शेतकरी शांतपणे आणि योग्य पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करू शकतील. यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.